Join us

कर्करोगाशी झुंजत अमृता देत आहे दहावीची परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 11:18 PM

कुर्लाच्या डोंगरचाळ या कष्टकऱ्यांच्या वस्तीत राहणारी अमृता महेंद्र कालुष्टे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मुंबई : दहावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षेच्या तणावाखाली असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसोबत एक अशीही विद्यार्थिनी आहे, जी आपल्या आयुष्याची लढाई लढत ही परीक्षा देत आहे. कुर्लाच्या डोंगरचाळ या कष्टकऱ्यांच्या वस्तीत राहणारी अमृता महेंद्र कालुष्टे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. लढवय्यी, जिद्दी वृत्तीची अमृता असाध्य आजार आणि दहावी अशा दोन परीक्षा एकत्र देत आहे.अमृता ही सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलची दहावी ‘अ’ची विद्यार्थिनी असून, तिला हाडांचा कर्करोग (बोन कॅन्सर) झाला आहे. त्यावरील उपचारार्थ २०१७ पासून ती नियमितपणे केमोथेरपी घेत आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार होत असून गेल्याच महिन्यात तिच्यावर एक लहानशी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. असे असतानाही जिद्दी स्वभावाची अमृता लेखन मदतनीसाच्या मदतीने दहावीचे पेपर देत आहे. पेपर लिहिण्यासाठी मी सलग जास्त वेळ बसू शकत नाही. पण मला परीक्षा बुडवायची नव्हती. आजारपणामुळे दहावीच्या वर्षात मला नियमितपणे शाळेत जाता आले नाही. पण शाळेतील शिक्षक आणि मैत्रिणींच्या सहकार्याने अभ्यास केल्याची माहिती अमृता हिने दिली.अमृताच्या वडिलांनी तिला लेखन मदतनीस मिळावा, अशी विनंती शाळेला केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाकडे यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर याबाबत परवानगी मिळाली. या परीक्षेत ती नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, याची खात्री असल्याची प्रतिक्रिया तिच्या शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी दिली.>धीरोदात्त संदेशनेही दिली परीक्षाचेंबूरमध्ये वडिलांच्या निधनानंतर धीरोदात्तपणे दहावीचा बोर्डाचा पेपर देणारा संदेश साळवे हा चर्चेचा विषय ठरला आहे. टिळकनगरातल्या पंचशीलनगरमध्ये राहत असलेल्या परमेश्वर साळवे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय साळवे कुटुंबातल्या वडीलधाºया माणसांनी घेतला. मात्र संदेशने आपल्या वडीलधाºयांना समजावल्यानंतर परीक्षा देऊन आल्यानंतर त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण पहिले ही वडिलांची शिकवण होती; आणि त्यांचीच इच्छा पूर्ण केल्याचे त्याने सांगितले.