मुंबई : भारतीय स्वातंत्र्याला येत्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्टने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा कार्यक्रम हाती घेतला असून, वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
देशातील सर्व प्रमुख बंदरांत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे निर्देश इंडियन पोर्ट असोसिएशनने दिले आहेत. त्यानुसार मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने प्रत्येक महिन्याला विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे सचिव यू. आर. मोहनराजू, वरिष्ठ उपप्रबंधक मिलिंद कुळकर्णी, उपप्रबंधक रुफी कुरेशी, वरिष्ठ कल्याण अधिकारी राजेंद्र रामगुडे, कॅटरिंग अधिकारी प्रीती पाटील व कार्यक्रमाचे समन्वयक विजय सोमा सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
२८ जून रोजी ‘भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ याविषयी निबंध स्पर्धा पार पडली. २९ जून रोजी ‘देशभक्तीपर गीतांची गायन स्पर्धा’ झाली, तर २ जुलैला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित ‘प्रश्नमंजुषा’ स्पर्धा घेण्यात आली. यापुढे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, करियर मार्गदर्शन, योग प्रशिक्षण, पोषक आहाराबाबत मार्गदर्शन, स्वसंरक्षणाचे धडे, व्याख्यानमाला, राष्ट्राचा विकास दर्शवणारे प्रदर्शन, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान व आदरांजली, वाळूवरील कला प्रदर्शन, स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम पार पडतील, अशी माहिती देण्यात आली.