मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले असून, आज भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेते किरिट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि मोहित कंभोज यांच्यावर अनेक गंभीर आरोप राऊत यांनी केले. त्यास आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी (Amruta Fadnavis) संजय राऊत यांना खोचक टोला लगावला होता. त्यावर, आता शिवसेनेच्या महिला नेत्यानं ट्विट करुन प्रतिटोला लगावला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राऊत यांनी शिवसेना स्टाईल आक्रमकता दाखवली. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर भाजपच्या राजकीय गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना टोला लगावला. त्यास शिवसेनेच्या महिला नेत्या आणि आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. ''शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालाने की कोशीष कर रही है।'' मामी गप्प बसा! असे ट्विट कायंदे यांनी केलं आहे. तत्पूर्वी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेला मांजर म्हटलं होतं.
दरम्यान, ही पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय असून, शिवसेनेचे अनेक येथे माझ्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणे आवश्यक असून, शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक वास्तूपासून सुरुवात करतोय, असे संजय राऊत यांनी नमूद केले.