राज्यभर आज धुळवड मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. मुंबईतही धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. कोरोना प्रकोपामुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना धुळवड साजरी करता आली नव्हती. निर्बंधांचा सामना करावा लागला होता. पण यंदा पुन्हा त्याच जोशानं अन् त्याच उत्साहात होळी आणि धुळवडीचं सेलिब्रेशन नागरिकांनी केलं. विशेष म्हणजे नेतेमंडळीही या रंगपंचमीच्या उत्साहात रंगून गेली आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी धुलीवंदन साजरे केल्याचे फोटो शेअर केले. यासह एक नॉटी कमेंट करुन शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी यापूर्वीही नॉटी कमेंट करत संजय राऊत यांना लक्ष्य केलं होतं. आता, होळी, रंगपंचमी सणाच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबत शिवसेनेला चिमटाही काढला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. कंगनाबद्दल अर्वाच्च शब्दाचा वापर केल्यानं संजय राऊतांवर चहुबाजूने टीका होत होती. कंगनावर टीका करताना संजय राऊतांनी हरामखोर या शब्दाचा वापर केला. त्याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राऊतांनी स्पष्टीकरणही दिले होते. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.
यापूर्वीही केलं होतं नॉटी ट्विट
अमृता फडणवीस यांनीएक ट्वीट करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. "थोडक्यात उत्तर द्या, ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले..... या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स ! _____शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है !" असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.