मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या आपल्या बिनधास्त स्वभावामुळेही महाराष्ट्राला परिचीत आहेत. मनाला वाटेल तसं त्या जगतात, अनेकदा रुढी-परंपरांना छेद देत त्या मार्गक्रमण करतात. आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची असलेली चौकट त्यांनी तोडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यावरुन, त्यांना ट्रोलही केले जाते, पण त्या ट्रोलर्संकडे दुर्लक्ष करत आपल्या स्वभावाप्रमाणेच जगतात. सुबोध भावे होस्ट असलेल्या 'बस' बाई बस या कार्यक्रमातही त्यांनी अनेक प्रश्नांची बिनधास्त उत्तर दिला. त्यावेळी, तुमच्या गळ्यात मंगळसुत्र का नसते, असा प्रश्नही त्यांना कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर, अमृता फडणवीसांनी भन्नाट उत्तर देऊन टाळ्या मिळवल्या.
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'बस बाई बस' (bus bai bus) हा नवा कार्यक्रम सुरु झाला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पहिल्या भागापासून लोकप्रिय ठरत असून प्रत्येक भागात दिग्गज आणि लोकप्रिय सेलिब्रिटी हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (supriya sule) सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (amruta fadnavis) या हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या नव्या भागाकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. या कार्यक्रमाचे काही प्रोमो समोर आले आहेत. त्यापैकी, एका प्रोमोत अमृता फडणवीस यांना तुम्ही गळ्यात मंगळसुत्र का घालत नाहीत?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी भन्नाट उत्तर दिले.
तुम्ही मंगळसुत्र घातल्यावर सासू ओरडत नाही का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर, मंगळसुत्र हे सौभाग्याचं निशाण असतं. तो आपला नवरा असतो, म्हणून मला वाटलं की आपल्या पतीनं आपला गळा पकडण्यापेक्षा आपला हात पकडावा, असे म्हणत त्यांनी हातात बांधलेलं मंगळसुत्र दाखवलं. तसेच, हे पाहिल्यानंतर मला देवेंद्रजींनी माझा हात पकडलाय, अशी भावना मनात येते, असे उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. त्यावर, उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या संकल्पनेला दाद दिली.
मामी म्हटल्यावर मज्जा येते
सध्या सोशल मीडियावर 'बस बाई बस' या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अमृता फडणवीसांनी अनेक गोष्टींवर भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे 'ज्यावेळी लोक मामी या नावाने हाक मारतात त्यावेळी नेमकं कसं वाटतं', हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी मामी म्हटल्यावर, खरं सांगू का.. मला मज्जा येते असं हटके उत्तर त्यांनी दिली. तसेच कुठे आसामला नेताय का? अशी कोपरखळीही मारली.