Sanjay Raut reaction on Amruta Fadnavis Blackmailing Case: अमृता फडणवीस यांच्या संदर्भातील ब्लॅकमेलिंग प्रकरण हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही. भाजपाला कुटूंबात घुसण्याची सवय आहे. तशी सवय आम्हाला नाही. आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर संस्कार आहेत. मला तोंड उघडायला लावू नका, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याच्या बातमीने मंगळवारी एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मलबारहिल पोलिसांनी गुरुवारी जयसिंघानी याची मुलगी अनिष्काला बेड्या ठोकल्या आहेत. तिने डिझायनर म्हणून अमृता यांच्याशी ओळख वाढवली होती.
अमृता फडणवीस धमकी प्रकारणावर राऊत म्हणाले...
"प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि त्यावर तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य होणार नाही. काल सभागृहात काय झालं, मविआमध्ये काय झालं हे सगळं सोडून द्या. आता तुमच्या सरकारच्या काळात काय होतंय त्याकडे आधी बघा. आमच्याकडे बोटं करत असताना काही बोटं स्वत:कडेही आहेत हे लक्षात ठेवा. मला तोंड उघडायला लावू नका. हा कुटुंबाचा विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असून ते मी कायम पाळतो," असे संजय राऊत म्हणाले.
महिला कोणीही असो...
"ब्लॅकमेलचं प्रकरण काय आहे याचा पोलिसांनी तपास करावा. आम्हीही तपास करू शकतो पण आम्हाला जास्त बोलायचं नाही. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि तपास करावा. कारण महाराष्ट्रात एखाद्या महिलेला ब्लॅकमेल केलं जात असेल तर ते गंभीर आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या-उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असोत की सामन्या महिला असो, असा प्रकार घडणं निंदनीय आहे," असा स्पष्ट विचार त्यांनी मांडला.
तुमच्या घरी कोणं येते याचा आमच्याशी काय संबंध?
"राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीबरोबर जर असा प्रकार घडत असेल तर याचा अर्थ राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. किंवा त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. जर असे प्रकार घडत असतील तर त्यात विरोधकांकडे बोट दाखवण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या घरी असं कोणी व्यक्ती येत असेल तर त्यात महाविकास आघाडीचा काय संबंध आहे? नाकाने कांदे सोलू नका. तपास होऊद्या आणि आरोपींना अटक होऊद्या," असे राऊत या प्रकरणाबाबत म्हणाले.