मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सामनाच्या संपादक पदावरुन उद्धव ठाकरेंना बाजुला व्हावे लागले. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती.
रश्मी ठाकरे यांची जवळपास 2 महिन्यानंतर सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळाला आहे. रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन अभिनंदन केले आहे.
आपल्या देशातील महिला आणि समाजाच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उच्च नेत्यापदावरील अधिक महिलांची आवश्यकता असल्याचे सांगत अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरेंचे सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच जनतेच्या महत्त्वाच्या विषयांवर मत मांडण्यासाठी चांगले व्यासपीठ असल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी यावेळी ट्विट करुन सांगितले.
उद्धव ठाकरे 'सामना'चे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते. आपल्या सामना या वर्तमानपत्रातून शिवसेना आपली भूमिका मांडत असते. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारवर ठाकरे शैलीत टीकाही करण्यात येते. आता, या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरेंकडे आली आहे.
संपादक हे पद लाभाचं पद असल्यामुळं ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. सामना वर्तमानपत्राच्या क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचं नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे. गेले काही महिने हे पद रिक्त होते. सध्या संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. देशाच्या राजकारणात सामना वर्तमानपत्रातील अग्रलेखावरुनच शिवसेनेची भूमिका समजून घेतली जाते. त्यावरुनच, चर्चा घडल्या जातात. आता, याच देशपातळीवर चर्चिले जाणाऱ्या सामनाच्या 'संपादक'पदाची जबाबदार रश्मी ठाकरेंकडे देण्यात आली आहे.