Rajya Sabha Election 2022: “अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है”; अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 03:48 PM2022-06-11T15:48:16+5:302022-06-11T15:49:14+5:30
Rajya Sabha Election 2022: भाजप काही महाविकास आघाडी नाही, रडीचा डाव खेळायला. हा सत्याचा विजय आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाविकास आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्मार्ट खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना, पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है, या शब्दांत अमृता फडणवीस यांनी कौतुक केले आहे.
शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है
भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देते. हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूने सर्वजण आहेत, याचा आनंद आहे. अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है. भाजपकडे लोक जे आले ते प्रेमाने आलेत. शिवसेनेला आता धडे मिळायला सुरुवात होईल. हा भाजपच्या स्वतःच्या कर्तृत्वावरील निकाल आहे. भाजप काही महाविकास आघाडी नाही, रडीचा डाव खेळायला, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. भाजपने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसे आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आले आहे. राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटामध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळाले ते एका अपक्ष आमदाराचे होते. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसे केले होते, असे शरद पवार म्हणाले.