मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रणशिंग फुंकले असून, भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी भाजप नेते किरिट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि मोहित कंभोज यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी (Amruta Fadnavis) संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला. केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर धाडसत्र, छापे सुरू आहेत. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख नेतेही येऊन मला भेटले. मात्र, भाजप नेत्यांची ही चाल आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असे इशारा संजय राऊत यांनी दिला. यानंतर आता राजकीय गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना टोला लगावल्याचे सांगितले जात आहे.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!
संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत या सगळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!”, असे केवळ एका ओळीचे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, ही पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय असून, शिवसेनेचे अनेक येथे माझ्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणे आवश्यक असून, शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक वास्तूपासून सुरुवात करतोय, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
तत्पूर्वी, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे शब्द ज्या व्यक्तीने सामनाच्या माध्यमातून २३ वर्षे शिवसैनिक आणि सामान्य माणसासमोर आणण्याचे काम केलेली व्यक्ती म्हणजे संजय राऊत आहेत. ते भाजपच्या धमक्यांना घाबरतील, असे भाजपवाल्यांना वाटत असेल. मात्र, मी कुणाला घाबरत नाही. भाजप नेते किरिट सोमय्या सांगतात की, आता संजय राऊत यांना अटक होणार आहे. ईडीची हिंमत असेल, तर माझ्या घरी येऊन दाखवावे. मला दोन वर्षे कैद करू शकतील, असे कोणतेही जेल बनलेले नाही, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.