Maharashtra Politics: “प्रगतीसाठी भाजपला मतदान करा, BMC निवडणुकीत आम्हीच धुरळा उडवू”: अमृता फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:04 PM2022-09-27T18:04:36+5:302022-09-27T18:06:26+5:30
Amruta Fadnavis: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलेल्या दिलासाबाबत अमृता फडणवीस यांनी सूचक शब्दांत भाष्य केले आहे.
Maharashtra Politics: एकीकडे सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसह दुसरीकडे राज्यात होणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. यातच मुंबई महानगरपालिकेत (BMC Election 2022) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याची मोकळीक दिली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आता निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाची आपण वाट पाहिली पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भाजपचे कमळ एकत्रित पाहण्याची इच्छा सर्वांची आहे. पण तसे होईल, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला.
प्रगतीच्या राजकारणासाठी भाजपला मतदान करा
देवाच्या कृपेने जे व्हायचे आहे, ते तसेही होणारच आहे. मला इच्छा आहे की, भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकदम धुरळा उडवेल. मुंबई महानगरपालिका जिंकण्यामागे भाजपचे प्रगतीचे राजकारण आहे. म्हणून आपण सर्वांनी भाजपला मतदान करावे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे.