मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. अल्बम, चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत आणि काही कार्यक्रमांमध्येही सुरेल गायनानं उपस्थितांची मनं जिंकली आहेत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - अर्थात आपल्या 'अहों'साठी त्यांनी काल पहिल्यांदाच एक लडिवाळ गाणं गायलं. हा योग जुळून आला, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर.
बॉलिवूडमधील गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल हिला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'परफॉर्मिंग आर्ट्स' या गटात तिनं बाजी मारली. तिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर, श्रेया आणि अमृता फडणवीस या दोघींशी अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांनी संवाद साधला. 'मोगरा फुलला' आणि 'घुमर' ही दोन गाणी श्रेयाकडून गाऊन घेतल्यानंतर, त्यांनी अमृता फडणवीस यांनाही गाण्याची विनंती केली. मुख्यमंत्री सततच कामात व्यग्र असतात, त्यांना कधी थांबवायची इच्छा झाल्यास कोणतं गाणं गाता, असं किशोरी यांनी विचारल्यानंतर अमृता थोडं लाजल्या आणि 'आज जाने की जिद ना करो', अशी लाडिक विनवणी त्यांनी समोरच बसलेल्या आपल्या पतिदेवांना केली.