मुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालून केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.
मनसेच्या बदलत्या भूमिकेवरुन भाजपा आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकत्र येत युती करु शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. त्यामुळे ते आता चांगल्या प्रकारे काम करतील असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. अमृता फडणवीस यांना याआधी एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देशातील प्रमुख राजकीय नेत्यांबद्दल विचारण्यात आले होते. यामध्ये राज ठाकरेंच वर्णन अमृता फडणवीस यांनी एन्टरटेनमेंट एन्टरटेनमेंट एन्टरटेनमेंट अशा शब्दांत केले होते.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील स्वागत केले होते. मात्र परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपाला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला हवी. मनसेने परप्रांतियांबाबत असणारी भूमिका बदलली तर भाजपा मनसे एकत्र येऊ शकतात, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते.
हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट
मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही. असे म्हणत राज ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणात मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले. तसेच, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन'' असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठीवेळी मराठी अन् हिंदूवेळी मी हिंदू असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.