हिशोब तर द्यावाच लागेल; 1.65 कोटींची खिचडी, किरीट सोमय्यांकडून स्क्रीनशॉट शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:17 PM2024-03-27T16:17:01+5:302024-03-27T16:22:18+5:30
शिवसेना नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले.
मुंबई - राज्यात राजकीय घमासान सुरू असून भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकून पक्षातील नेते फोडले जात असल्याचेही महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून बोलले जाते. त्यातच, आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून मिशन ४५ घेऊन भाजपा महायुती मैदानात उतरली आहे. त्यामुळे, आपली ताकद वाढविण्यासाठी इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्यात येत आहेत. मात्र, अमोल किर्तीकर यांनी शिवसेना उबाठा गटासोबत राहिल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई ईडीची करण्यात येत असल्याचाही आरोप होत आहे. मात्र, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन हिशोब तर द्यावाच लागेल असे म्हटले आहे.
शिवसेना नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. मात्र, त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना उबाठा पक्षाने आज १७ जागांवरील आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, अमोल किर्तीकरांचे नाव आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर काही वेळातच ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपत्तीवर धाड टाकली. अमोल किर्तीकर यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावली आहे. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक अमोल किर्तीकर यांच्या बंगल्यावर पोहोचले असून, झाडाझडती करण्यात आली. मात्र, याबाबत तक्रारकर्ते भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन हिशोब तर द्यावाच लागेल, असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे सेना उमेदवार अमोल किर्तिकरचा खात्यात खिचडी घोटाळ्याचे ₹1.65 करोड...
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 27, 2024
हिसाब तो देना पडेगा!!
Uddhav Thackeray Sena Candidate Amol Kirtikar received ₹1.65 crore of KHICHDI Scam
Hisab to Dena Padega @BJP4India@mieknathshinde@Dev_Fadnavispic.twitter.com/xtxeJamKnA
उद्धव ठाकरे सेना उमेदवार अमोल किर्तीकरचा खात्यात खिचडी घोटाळ्याचे ₹1.65 करोड, असे म्हणत किरीट सोमय्यांनी केलेल्या तक्रारीचा जुना स्क्रीनशॉट टाकला आहे. तसेच, हिसाब तो देना पडेगा...! असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा विरोधकांकडून किरीट सोमय्या ट्रोल होण्याची शक्यता आहे. कारण, ईडी कारवाई सुरू असेलल्या आणि नुकतेच भाजपात आलेल्या नेत्यांवर ते बोलताना दिसत नाहीत.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका
किर्तीकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येते. यातच ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याच्या काही तासांत अमोल कीर्तिकर यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीमुळे पुन्हा एकदा ईडीच्या टायमिंगवर चर्चा सुरू झाली आहे. अमोल किर्तीकर यांना दिवसभरात हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे ईडीचा ससेमिरा मागे लागल्याने अलीकडेच काही नेत्यांनी पक्षांतराची भूमिका घेतली होती.