Join us

परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा, नीलम गोऱ्हेंची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 12:53 PM

विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई : राज्यात होणाऱ्या परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करांराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. 

विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रवींद्र पवार, उद्योजकांचे प्रतिनिधी सौरभ शहा, उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अविनाश रणखांब, मानसी पाटील यांच्यासह अमेरिकन- महाराष्ट्र विकास परिषदेचे मुकुंट कुटे व किशोर गोरे हे न्यू जर्सी येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, राज्य शासनाने गुंतवणुकीसंदर्भात विविध सामंजस्य करार केले आहेत. या करांराबाबतची माहिती संबंधित विभागांनी अद्ययावत करून त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. या करांराच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्यास्तरावरून या करांराबाबतची माहिती घ्यावी. तसेच लहान व मध्यम उद्योजकांना निर्यात वाढविण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्यासाठी उद्योग संघटनांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करावे. यासंदर्भात लवकरच व्यापक आढावा घेण्यात येईल.

उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले की, राज्य शासन निर्यात येत्या पाच वर्षांत दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासन पातळीवरून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण्यात येत आहे. याबाबत उद्योजकांमध्ये जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :नीलम गो-हेविधान परिषद