एम टी एच एल परिसरात आदर्श विकास केंद्र उभे राहणार
By सचिन लुंगसे | Published: January 20, 2024 07:33 PM2024-01-20T19:33:34+5:302024-01-20T19:34:34+5:30
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक संलग्न परिसरात आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.
मुंबई: मुंबई ट्रान्सहार्बर लिंक संलग्न परिसरात आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक विकासासाठी पूरक वातावरण तयार होईल. शाश्वत स्वरुपाची जागतिक गुंतवणूक आकर्षित होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. एमएमआरडीए आणि वर्ल्ड स्मार्ट सिटीज फोरम, युके यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून, एमएमआर परिसरात तंत्रज्ञानधिष्ठित, सर्वसमावेशक अशा स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी हा करार दिशादर्शक असेल. स्मार्ट सिटी मास्टर प्लॅनिंग आणि टेकसँडबॉक्सच्या माध्यमातून हा तडीस नेला जाणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हाताळणीत वर्ल्ड स्मार्ट सिटीज फोरमचे कुशल तंत्रज्ञ स्मार्ट सिटीच्या नियोजनावेळी एमएमआरडीएला मदत करतील. सहाय्य करतील. फोरमचा अनुभव आर्थिक वाढीला चालना देईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि संलग्न भागातील नागरिकांचे राहणीमान उच्चतम दर्जाच्या दृष्टीने हा प्रकल्प निर्णायक ठरेल. सामंजस्य कराराअंतर्गत परस्पर सहकार्यातून मास्टर प्लॅनची आखणी करण्यात येईल. जेणेकरून एमएमआर प्रदेश ऊर्जा आघाडीवर स्वावलंबी असेल, अशी पुनर्रचना करण्यात येईल.
स्मार्ट होम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येईल. हवामान बदलाचा सामना करु शकतील, अशी भविष्यकालीन शहरांची उभारणी केली जाईल. ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनानंतर हा भाग प्रचंड विकसित केला जाऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे. डिजिटल सक्षमीकरण, एमएमआर भागाचा शाश्वत विकास यासाठी हा करार चालना देणारा ठरेल. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद एमएमआरला मिळू शकेल. - संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए