मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यापेक्षा गुन्हा घडण्यापूर्वीच त्याची चाहूल लागली तर? ऐकून विश्वास बसणार नाही. मात्र हे शक्य असून, मुंबई पोलिस दलात हॉकी स्टिक कॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त सहायक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांनी असा अलार्म आणला आहे. एखाद्या संशयित व्यक्तीबाबतचा अलार्म संबंधित सुरक्षा यंत्रणा, मालक, कर्मचाऱ्यांना अलर्ट करत आहे.
बेकायदा कृत्यांविरोधात बेधडक कारवाई करणारे वसंत ढोबळे २०१५ मध्ये निवृत्त झाले. हॉकी स्टिक घेऊन बारवर धडक कारवाईमुळे त्यांचा दरारा होता. निवृत्तीच्या अखेरच्या टप्प्यात मुंबई पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रोजेक्टबाबत नोडल अधिकारी म्हणून दीड वर्ष काम करण्याची संधी ढोबळे यांना मिळाली. यादरम्यान सीसीटीव्हीद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून कुठे काय सुरू आहे? काय झाले? किंवा गुन्हेगार शोधण्यासाठी वापर होत होता. मात्र गुन्हा घडण्यापूर्वीच याबाबत समजले तर, हा विचार ढोबळे यांच्या मनात आला. मात्र त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर उपलब्ध नव्हते. पुढे हीच पोकळी भरून काढत अलार्म सिस्टिम सुरू केल्याचे ते सांगतात. मुंबईतल्या विविध कंपन्या तसेच काही सोसायट्यांमध्ये ढोबळे यांची ही अलार्म यंत्रणा कार्यरत आहे.
प्रवासाची सुरुवात
- न्यूझीलंडमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असलेला मुलगा क्षितिजला अशा स्वरूपाच्या सॉफ्टवेअरबाबत विचारले. क्षितिजनेही मुंबई गाठून वडिलांसोबत काम सुरु केले. मेक इन इंडिया अंतर्गत जानेवारी २०१६ मध्ये डीएनएस म्हणजेच डेटा अॅनालिटीकल सिस्टिम नावाची कंपनी सुरु केली.
- सुरुवातीला लहान मुलांच्या शोधण्यासाठी ट्रेसिंग सिस्टिम सुरु केली. यामध्ये हरवलेल्या मुलांचा फोटो सीसीटीव्ही यंत्रणांना जोडून तो कुठेही दिसल्यास त्याबदल्यात माहिती मिळविण्यास मदत झाली.
- हजारो मुलांना शोधून काढले. पुढे. गुन्हा घडण्यापूर्वीच माहिती मिळविण्याच्या अनुषंगाने काम सुरू केले. कोरोनाच्या काळात या प्रोजेक्टला यश आले आणि गुन्ह्याची चाहूल ओळखणारी यंत्रणा कार्यान्वित केली.
पाच वर्षांपर्यंत डेटा टिकतो.....
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ठराविक वेळेपर्यंत रेकॉर्डिंग सेव्ह असते. एकाचवेळी सगळीकडे मॉनिटरिंगही शक्य होत नाही.
- २ सीसीटीव्ही यंत्रणाशी सेट ऑफ बॉक्स प्रमाणे याचा प्रोसेसर आवश्यक ठिकाणी बसवला जातो. तो सर्व हालचाली कॅमेऱ्यातून टिपत असतो. या यंत्रणेचा कॅमेरा ५ वर्षांपर्यंत डाटा सेव्ह करून ठेवू शकतो.
सिस्टीम असे करते काम....
- एखाद्या भिंतीवर किंवा प्रवेशद्वारातून कोणी येत असल्यास त्याबाबत अवघ्या दोन सेकंदात पाच जणांना अलार्म जातो.
- त्यामुळे वेळीच अलर्ट होऊन संबंधित धोका टाळता येऊ शकतो.
- प्राणी, गर्दी यांसाठी ही सिस्टीम उपयुक्त ठरली.
सीमा भागात होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी ही यंत्रणा मोलाची ठरू शकते. त्या दृष्टीने काम सुरु आहे. बीएसएफ, सीआयएसएफच्या अधिकाऱ्यापर्यंत हा प्रस्ताव नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच ती रोखता यावी यासाठी धडपड सुरु आहे. - वसंत ढोबळे, निवृत्त एसीपी