मनोहर कुंभेजकर, मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. गेल्या वर्षी काही एनजीओंनी न्यायालयात खटले दाखल करून गणपती विसर्जन करण्यापासून नागरिकांना वंचित करण्याचा आदेश प्राप्त करून घेतल्याने गणेश भक्त आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. मुंबई शहरात गणेश उत्सव छोट्या मोठ्या प्रमाणात साजरा करणाऱ्या गणेश भक्त आणि गणेश मंडळाची संख्या गेल्या काही वर्षात झपाटयाने वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे दीड दिवस, पाच दिवस,गौरी गणपती आणि अनंत चतुर्थीला छोट्या आणि सार्वजनिक गणेश मूर्त्यांचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विसर्जन होते. मात्र यंदा न्यायालयाच्या आदेशामुळे येथे गणेश विसर्जनाची फार मोठी अडचण निर्माण झाली होती. या संदर्भात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि शिष्टमंडळाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन संचालक मल्लिकार्जुन यांची भेट घेवून या जागेची पाहणीसुद्धा केली.
न्यायालयात पुन्हा यासंदर्भात अर्ज दाखल करून मार्ग काढून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात यंदा गणेश विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करण्याचा महत्वाचा निर्णय मल्लिकार्जुन आणि उपस्थित प्रतिनिधी मंडळतील सर्व सदस्याने ठरविल्याची माहिती त्यांनी 'लोकमत'ला दिली.
या बैठकीत न्यायालयाच्या आदेशनुसार राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात गणेश विसर्जन न करता गणेश विसर्जन साठी येथील पार्किंग एरियात छोटे कृत्रिम तलाव (पोंड) बांधावे आणि संजय गांधी उद्याना लगत आलेल्या श्रीकृष्ण नगर नदीचे पाणी वाहून जाते.वत्या ठिकाणी बांध बांधून पाणी संचय करून तिथेचे श्री गणेश विसर्जन व्यवस्था करण्याचा महत्वाचा पर्याय मल्लिकार्जुन आणि उपस्थित शिष्टमंडळाच्या सर्व सदस्यांनी ठरविल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी उत्तर मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, रिवर मार्च संस्थेचे गोपाळ झवेरी, विक्रम चौगुले, सुधीर सरवणकर, हनुमान मेकला सहित भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.