मुंबई-लोकशाही मध्ये मतदानाचे निर्विवाद महत्त्व असूनही, अनेक ठिकाणी कमी मतदान ही प्रमुख चिंतेची बाब आहे. कमी मतदान क्षेत्रांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरी सहभागाला चालना देण्यासाठी तसेच लोकशाहीचे मूलतत्त्व टिकवून ठेवण्यासाठी स्वीप टीमने एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह दहिसर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी जागृती मोहीम राबवली.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 153- दहिसर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वीप टीम विविध निवासी भागात भेटी देत आहे आणि पथनाट्य, मतदार प्रतिज्ञा आणि जनजागृतीशी संबंधित अनेक उपक्रम राबवत आहे. असेच एक पथनाट्य एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी दहिसर पूर्वेतील भरुचा रोड येथे सादर केले होते, जिथे ५० टक्के पेक्षा कमी मतदान झाले आहे. तसेच प्रत्येक मत हे बहुमूल्य आहे आणि मतदान करणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे असे एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी यांनी व्यक्त केला.