लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ उल्हासनगर: महाराष्ट्रासह गोवा, आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करण्यासह विविध गुन्हे दाखल असलेला कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मलबारहिल पोलिसांनी गुरुवारी जयसिंघानी याची मुलगी अनिष्काला बेड्या ठोकल्या आहेत. तिने डिझायनर म्हणून अमृता यांच्याशी ओळख वाढवली होती.
अटक अन् ड्रामा : मुंबई पोलिसांच्या पथकांनी दुपारी अनिष्का आणि तिचा भावाला ताब्यात घेण्यासाठी उल्हासनगर येथील घर गाठले. भावाने तब्येत बिघडल्याचे सांगताच त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास भाग पाडले, तर अनिष्काने परीक्षा सुरू असल्याचे सांगून सोबत येण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीअंती सायंकाळी तिच्यावर अटकेची कारवाई केली.
अनिल जयसिंघानी कोण ? : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी हा मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलिस उपायुक्त अमर जाधव यांच्या विरोधातील खंडणीच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. जाधव यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याची वेळ आली होती. त्याच्या विरोधात १५ गुन्हे दाखल असून तो ८ वर्षांपासून पसार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"