मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:36 AM2023-11-16T11:36:01+5:302023-11-16T11:37:56+5:30
मुंबई : मेट्रो प्रोजेक्टच्या सिटी बँक ते कलानगर या परिसरात लोखंडी बॅरिकेट्सचे आणि चैनलचे तुकडे करून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...
मुंबई : मेट्रो प्रोजेक्टच्या सिटी बँक ते कलानगर या परिसरात लोखंडी बॅरिकेट्सचे आणि चैनलचे तुकडे करून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कमलुद्दीन शहाला (३२) रंगेहात पकडण्यात आले. शहा हा प्लास्टिक भंगारचा धंदा करत असून गोवंडीचा राहणारा आहे. त्याला सुरक्षारक्षकांनी बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईटवरील सुरक्षारक्षक त्रिपुरारी पांडे (३८) यांनी बीकेसी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ते सदर मेट्रो प्रकल्पाच्या साइटवर राऊंड मारत पाहणी करत होते. त्यावेळी त्या ठिकाणी मेट्रोच्या पिलर जवळ एक इसम उभा असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी त्याला हटकले असता तो पळून गेला. पांडे यांनी त्या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य तपासले तेव्हा त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट आणि चैनल बोर्डचे तुकडे करण्यात आल्याचे त्यांना आढळले.
१५ हजार रुपयांचे लोखंड चोरण्याचा प्रयत्न
हे तुकडे तो पळवून नेण्याच्या तयारीत होता. त्यांच्या लक्षात आल्याने त्यानी साथीदाराच्या मदतीने त्याचा शोध घेतला. तेव्हा एका लोखंडी बॅरिकेटच्या मागे लपलेला चोर कमलुद्दीन शहा (३२) त्यांना दिसला. शहा हा प्लास्टिक भंगारचा धंदा करत असून गोवंडीचा राहणारा आहे. त्याने जवळपास १५ हजार रुपये किमतीचे लोखंड चोरण्याचा प्रयत्न केल्याचे पांडे यांचे म्हणणे असून त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.