Join us

... अन चालकाने आमदाराला थेट खाली उतरवले; टोलमाफीचा वाद टोकाला, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Published: September 07, 2023 11:37 PM

आमदाराने पोलिसांत धाव घेत तक्रार देताच पोलिसांनी खासगी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई: टोलच्या मुद्यावरून राजकारण तापले असतानाच, टोल माफीच्या वादातून ओला टॅक्सी चालकाने आमदाराला अर्ध्या वाटेतच खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार वाकोला परिसरात घडला आहे. एवढेच नाही तर आमदाराला हातपाय तोडण्याची धमकी दिली. अखेर, आमदाराने पोलिसांत धाव घेत तक्रार देताच पोलिसांनी खासगी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

 भंडारा जिल्ह्यातील  तुमसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू माणिकरावजी कारेमोर (५३) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. कारेमोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी दिल्लीवरून ते मुंबई विमानतळावर आले. तेथून आकाशवाणी आमदार निवासाकडे जाण्यासाठी त्यांनी  विमानतळावरील टर्मिनस २ येथून ओला कंपनीच्या एका टॅक्सीची नोंदणी केली. कारोमोर टॅक्सीत बसले. चालकाला आमदार असल्याचे सांगून, आमदारांना टोल माफ असल्यामुळे वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील संबंधीत मार्गिकेवरून टॅक्सी घेऊन चल, असे सांगितले. मात्र, टॅक्सीचालकाने नकार देत टोलच्या पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. टोल घेतला, तर टोलचे पैसे देईल, असेही आमदारांनी त्याला सांगितले. पण टॅक्सीचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने आमदार निवास येथे जाण्यास नकार दिला आणि कारेमोर यांना वाकोला जंक्शन येथे टॅक्सीतून खाली उतरवले. तसेच हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकीही त्याने दिली,असे तक्रारीत म्हटले आहे.

अखेर, कारेमोर यांनी तात्काळ वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी धमकी दिल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा नोंदवत त्याचा शोध घेत आहे. 

टॅग्स :पोलिसमुंबई