वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:18 AM2022-04-01T11:18:32+5:302022-04-01T11:19:22+5:30

गृहखात्यातील कर्मचारीच चालवतोय 'जॉब रँकेट'?, तिघांविरोधात गुन्हा दाखल

An elderly farmer from Nanded has lost money for a job in his son's home department | वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

वृद्ध शेतकऱ्याने मुलाच्या नोकरीसाठी गमावली जमापूंजी, कर्मचारी निघाला फ्रॉड

Next

मनीषा म्हात्रे

मुंबई : मंत्रालयात कामकाजासाठी फेऱ्या सुरु असताना, एका वृद्ध शेतकऱ्याला एक तरुण वाटेतच गाठतो. मुलाला गृह विभागातून एसआरपीएफमध्ये नोकरी देण्याचे स्वप्न दाखवतो. आपल्या मुलाच भल होत आहे तर, गावातल्या आणखी काही तरूणांना नोकरी मिळवून देण्याची विनंती हा शेतकरी करतो. पुढे १६ लाख रुपयांमध्ये शेतकऱ्याच्या मुलासह चौघाच्या नोकरीसाठीचा व्यवहार ठरतो. महिनाभरातच, 'हॅलो मी गृह खात्यातून बोलतोय. तुमच्या मुलाच्या नोकरीची ऑर्डर निघाली आहे.' असा कॉल येताच ७० वर्षीय शेतकरी मुलासह मंत्रालय गाठतो. तेथे, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या पांढऱ्या कारमधून त्यांना मंत्रालयात नेले जाते. मात्र, नोकरीची ऑर्डर कॉपी मिळण्यापूर्वी नांदेडच्या शेतकऱ्यावर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ ओढवली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुळचे नांदेडच्या हिब्बट गावातील रहिवासी असलेले शेतकरी शंकर गणेशराव मुंढे (६७) यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. मुंढे यांनी २०१३ मध्ये पोलीस पाटील तर, २०१८ ते २०२० पर्यंत हिब्बट गावाचा सरपंच म्हणून काम केले आहे. सध्या ते शेती बरोबर एक आश्रमशाळा चालवत आहेत. याच आश्रमशाळेला अनुदान मिळावे यासाठी मंत्रालयातील समाजकल्याण विभागात त्यांची ये-जा सुरु होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नेहमीप्रमाणे ते कामासाठी मंत्रालयात गेले असताना एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याने त्याचे नाव राहुल धनंजय देशमुख (३५) असल्याचे सांगून, औरंगाबाद एसआरपीएफ असून, गृहखात्यातील ओळखीतून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. 

दोन दिवसांने देशमुख याने, मुंढे यांना कॉल करून एसआरपीएफमध्ये जागा निघाल्या असून, तुमच्या मुलांना नोकरी लावायची आहे का? अशी  विचारणा केली. मुंढे यांनी नातेवाईकासह स्वतःच्या मुलाला नोकरी लावण्याबाबत सांगताच देशमुख याने त्यांना कागदपत्र घेवून औरँगाबाद येथे बोलावून घेतले. त्यानुसार, नोव्हेबरमध्ये मुलासह चौघाची कागदपत्रे घेऊन, देशमुख त्यांना औरंगाबादच्या एसआरपीएफ कम्प येथे घेवून गेला. याच दरम्यान, देशमुखच्या गणवेशामुळे तो एसआरपीएफमध्येच असल्याचा त्यांचा विश्वास बसला. देशमुखने त्यांना १६ लाख रुपये खर्च सांगितला. त्यांनीही नोकरी लागल्यानंतर पैसे देण्याची तयारी दर्शवली. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्याचे नावे असलेले आधारकार्ड, पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सच्या फोटोची प्रत दिली.    

१२ डिसेंबर रोजी सुधीर नावाच्या व्यक्तीने कॉल करून गृह खात्यातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मुलांची ऑर्डर निघाली असून, मंत्रालयात येण्यास सांगितले. त्यानुसार, २० डिसेंबर रोजी मुलासह मंत्रालय गाठले. राहुल याने मंत्रालयात गृह खात्यात जाण्याकरीता तेथील सुधिर नावाच्या व्यक्तीला फोन करून दोन पास आणण्यास सांगीतले. त्यानुसार सुधिरने आणलेल्या पासवर मुंढे यांचा मुलगा पुढे गेला. त्यापाठोपाठ प्रवेशद्वाराबाहेर आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या महाराष्ट्र शासन लिहिलेल्या कारमधून देशमुखांसोबत मुंढे आत गेले. कारणामुळे त्यांचा आणखीन विश्वास बसला. त्यांनी, साडे तीन लाख रुपये देशमुखकडे देत उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर देणार असल्याचे सांगितले. तेथून देशमुख आणि कार चालकासोबत ते मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पोहचले. तेथे बाहेरच, मुंढे यांना बसवून ऑर्डर कॉपी आणण्यासाठी जात असल्याचे सांगून निघून गेले. बराच वेळ उलटूनही दोघे न परतल्याने त्यांना संशय आला. फोनही बंद लागला. तेथून निघून गेले. बरेच दिवस उलटूनही त्यांचा काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दोन महिन्यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रार अर्जावरून अखेर, बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तपास सुरु
याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु आहे. अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.
 विश्वनाथ कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे

जमापूंजी गमावली...
आपल्यानंतर मुलाचे भवितव्य चांगले व्हावे. त्याला सरकारी नोकरी लागावी म्हणून जवळची जमापूंजी यात खर्च केली. त्यामुळे आरोपीना लवकरात लवकर अटक करणे गरजेचे आहे. माझ्या सारखे अनेक जण या जाळ्यात अडकल्याची शक्यता नाकारता येत नाही. 
-  शंकर मुंढे, तक्रारदार शेतकरी,नांदेड़
 
मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा रॅकेटमध्ये सहभाग?
गृहखात्यातील कर्मचारीच हे  जॉब रँकेट' चालवत असल्याचे मुंढे यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार, त्यांना भेटलेल्या व्यक्तीबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे. यातून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: An elderly farmer from Nanded has lost money for a job in his son's home department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.