Join us  

पवार कुटुंबाकडून इमोशनल कार्ड?; रोहित पवारांच्या चौकशीवेळी आजोबांनंतर आता आजीही मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:58 PM

सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट इमोशनल कार्ड खेळत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

NCP Rohit Pawar ( Marathi News ) : कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. रोहित यांची बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १२ तास चौकशी केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. कुटुंबातील तरुणाला केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा सामना करावा लागत असल्याने पवार कुटुंबातील सर्व सदस्य रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या चौकशीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: पक्षाच्या कार्यालयात दिवसभर बसून होते, तर आजच्या चौकशीवेळी रोहित पवार यांना बळ देण्यासाठी त्यांच्या आजी प्रतिभा पवार या दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून राहणार असल्याची माहिती आहे.

रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली जात असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजही ईडी कार्यालयाबाहेर दाखल होत रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य ईडी कार्यालयाच्या शेजारीच असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित राहत आहेत. ईडी चौकशीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट इमोशनल कार्ड खेळत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

रोहित पवारांवर नेमका काय आहे आरोप?

रोहित पवारांची चौकशी होत असलेलं प्रकरण हे महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी ५ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. प्राप्त माहितीनुसार, कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता व त्यावेळी केवळ ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी जी प्राथमिक पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती ती रक्कम त्या कंपनीने बारामती ॲग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. बारामती ॲग्रोने कन्नड कारखान्याच्या खरेदीसाठी जी रक्कम दिली ती रक्कम बारामती ॲग्रोने विविध बँकांतून स्वतःच्या कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी घेतली होती. मात्र, त्याचा वापर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीसाठी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

टॅग्स :रोहित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअंमलबजावणी संचालनालय