महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:37 AM2024-09-19T05:37:09+5:302024-09-19T05:37:52+5:30
रिकाम्या झालेल्या मखरामुळे डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या भक्तांनी लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घातली.
मुंबई : ढोल-ताशांचा आवाज, डीजेचा दणदणाट, गुलालाच्या उधळणीमुळे गुलाबी झालेला आसमंत आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, अशा उत्फुल्ल वातावरणात श्री गणरायांना मंगळवारी समस्त भक्तगणांनी भावपूर्ण निरोप दिला. रिकाम्या झालेल्या मखरामुळे डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या भक्तांनी लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घातली.
मुंबई आणि उपनगरांत मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना सकाळपासूनच सुरुवात झाली. मानाचा मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या बाप्पाची मिरवणूक अग्रस्थानी होती. त्यापाठोपाठ लालबागचा राजा आणि दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती एकामागोमाग एक चौपाटीकडे रवाना होऊ लागल्या. रात्री उशिरापर्यंत गिरगाव चौपाटीसह जुहू चौपाटी व इतर विसर्जनस्थळे गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. गिरगाव चौपाटीवर खेतवाडीतल्या गल्लीमधील श्रीगणेशमूर्तींसह विविध मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.
मुंबईच्या उपनगरात म्हणजे पूर्व उपनगरात कुर्ला येथील शीतल तलावांत कुर्ला, सायन, साकीनाका, घाटकोपर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींसह घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसमुदाय उसळला होता.
बहुतांशी घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यावर्षी नैसर्गिक विसर्जनस्थळांऐवजी कृत्रिम स्थळांना प्राधान्य देण्यात आले होते.
मंडळाच्या अथवा सोसायटीच्या आवारात विसर्जन
मिरवणूक काढून कृत्रिम तलावांत मूर्तींचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत केले जात होते.
२० तास मिरवणूक
लालबागचा राजा मंगळवारी सकाळी ११ वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. यंदा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हे अंतर पार करण्यास तब्बल २० ते २४ तास लागले. कोळी बांधवांनी ब्रास बँड आणि बोटींच्या माध्यमातून समुद्रात लालबागच्या राजाला बुधवारी सकाळी सलामी दिली. त्यानंतर राजा तराफ्यावर बसून विसर्जनास सज्ज झाला. यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणला होता.