मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्र यावे, अशी चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
अजित पवार आणि त्यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीच ठाकरे बंधू एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये, असे विधान केल्याने त्यात आणखी भर पडली होती. मात्र राज ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता तूर्तास मावळल्याचे मानले जात आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याचा मुद्दा तसेच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आणि इतर विषयांवर राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.