उद्या CM शिंदेंच्या हस्ते सीमेवरील कुपवाडा येथे स्थापित होणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:02 PM2023-11-06T21:02:35+5:302023-11-06T21:05:01+5:30
"आम्ही पुणेकर" सामाजिक संस्था आणि आरआर-41च्या जवानांचा पुढाकार
मुंबई: जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्थापित होणार आहे. उद्या (७ नोव्हेंबर) रोजी सकाळी १०.३० वाजता हा अनावरण समारंभ संपन्न होणार असून यासाठी जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित राहणार आहे.
कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन करण्यात येईल. सांस्कृतिक कार्य मंत्रीसुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे.
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित आहेत.