मुंबई : ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम जीवनचरित्र’ या विषयावर आधारित चित्रकला, निबंध, कविता लेखन आणि नाट्य स्पर्धेत अवघ्या दहा दिवसांत मुंबईतील एक लाख २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला या विभागात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ७० हजार चित्रांचे शाळेत तसेच शाळेच्या जवळपास असलेल्या मंदिरात, सभागृहात प्रदर्शन भरवले जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ‘पद्मश्री’रमेश पतंगे, गीतकार श्रीधर फडके, आमदार पराग अळवणी, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी उपस्थित होते.
लोढा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. महानगरपालिकेच्या एक हजार १३८ शाळांमधील तब्बल १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने अतिशय कमी वेळात ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे हे सर्व कौतुकास पात्र आहेत, असे लोढा म्हणाले. या स्पर्धेतील चित्रकला या विभागात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे या ७० हजार चित्रांचे शाळेत तसेच शाळेच्या जवळपास असलेल्या मंदिरात, सभागृहात प्रदर्शन भरवावे, अशी सूचना त्यांनी केली.कार्यक्रमात
मान्यवरांनी विनंती केल्यामुळे फडके यांनी गीत रामायणातील काही ओळी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर, हजारो वर्षांपासून असलेली रामायणाची गोडी अजूनही टिकून आहे. याच अनुषंगाने आयोजित केलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये त्यांच्या कवितांमध्ये, चित्रांमध्ये, निबंधांमध्ये मला सुप्त महर्षी वाल्मिकी दिसले , असे उद्गार पतंगे यांनी काढले. स्पर्धेतील काही मुलांच्या कविताही वाचून दाखवल्या
महानगरपालिकेच्या १ हजार १३८ शाळांमधील एक लाख २० हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण १६ हजार ७२ विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यापैकी निवडक ४० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आल्याचे, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव यांनी सांगितले