Join us  

अंटार्टिकाची रंगभ्रमंती घडवणारे भालेराव यांचे चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटरमध्ये लक्ष वेधणार निसर्गरम्य चित्रे

By संजय घावरे | Published: May 14, 2024 5:46 PM

१४ मे रोजी सुरू झालेले डॅा. माया भालेराव यांचे चित्र प्रदर्शन २० मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

मुंबई - मूळच्या पुण्यातील असलेल्या चित्रकार डॉ. माया भालेराव यांच्या निसर्गरम्य चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. कला प्रेमींना हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

१४ मे रोजी सुरू झालेले डॅा. माया भालेराव यांचे चित्र प्रदर्शन २० मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात भालेराव यांनी रेखाटलेली अंटार्टिका खंडावरील अचंबित करणाऱ्या निसर्गाची चित्रे पाहायला मिळतील. चित्रकार डॉ. माया भालेराव व्यवसायाने भूलतज्ज्ञ असून, आकुर्डी येथील डॉ. भालेराव हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबर चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी असंख्य फुले, निसर्ग चित्रे जलरंगाच्या माध्यमातून साकारली आहेत. पृथ्वीचे दक्षिण ध्रुव अर्थात अंटार्टिका खंडावरील अचंबित करणाऱ्या निसर्गाची हुबेहुब चित्रे रेखाटली आहेत. यामध्ये बर्फाच्छादित डोंगर, ग्लेशियर्स पेंग्विन्स, बर्फमय महासागर आणि नॉर्थन लाइट्स ही चित्रे प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत.

या प्रदर्शनाबाबत भालेराव म्हणाल्या की, अंटार्टिकाची चित्रे काढण्यापूर्वी मी तो प्रदेश पाहिला आहे. २०१२ मध्ये अंटार्टिकाला गेले होते. २०१२ मध्ये अंटार्टिका भ्रमंतीवर आधारित 'ध्रुवभ्रमंती' नावाचे पुस्तकही लिहिले. माझे पती डॉ. सुधीर भालेराव यांनी तिथल्या निसर्गाची खूप छायाचित्रे टिपली होती. त्यावरून मी हि चित्रे रेखाटली आहेत. तिथला बर्फ, थंडी, पाणी, सोसाट्याचा वारा अशा बऱ्याच गोष्टी स्वत: अनुभवल्याने चित्रे काढताना कुठेतरी ते माझ्या मनात होते. त्याचा उपयोग चित्रे काढताना झाल्याचेही माया म्हणाल्या.

टॅग्स :मुंबईकला