उद्धव ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात 'मातोश्री'वर दीड तास बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 02:18 PM2023-10-21T14:18:18+5:302023-10-21T14:19:13+5:30

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होते.

An hour and a half meeting between Uddhav Thackeray and former Police Commissioner Sanjay Pandey on 'Matoshree' | उद्धव ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात 'मातोश्री'वर दीड तास बैठक

उद्धव ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात 'मातोश्री'वर दीड तास बैठक

मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात शुक्रवारी रात्री मातोश्री बंगल्यावर बैठक पार पडली. रात्री उशिरा संजय पांडे हे मातोश्री बंगल्यावर पोहचले. त्याठिकाणी तब्बल एक ते दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड बैठक झाली. त्यात कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होते. मविआ सरकारच्या काळात ते निवृत्त झाले. परंतु मधल्या काळात त्यांना सीबीआयनं एका प्रकरणात अटक केली होती. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने संजय पांडे यांना जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी रात्री ठाकरे आणि संजय पांडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीचा गुप्तता पाळण्यात आली. तासाभराहून अधिक वेळ दोघांमध्ये चर्चा सुरू होती. बैठकीत कुठली चर्चा झाली आणि या भेटीमागचा हेतू काय याबाबत स्पष्टता नाही.

संजय पांडे हे वादात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. अशावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणे हा चर्चेचा विषय आहे. संजय पांडे यांच्या कारकिर्दीत अनेक घटना घडल्या. त्यावरून मविआ सरकारवर विशेषत: उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आले होते. या भेटीत याच घटनांसंदर्भात काही चर्चा झालीय का अशीही कुजबूज राजकीय वर्तुळात आहे.

संजय पांडे या प्रकरणात झाली होती अटक

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना १९ जुलै २०२२ रोजी अटक केली होती. २००९ ते २०१७ या कालावधीमधे राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग झाल्याचे उघडकीस आले होते. याच प्रकरणात सीबीआयने ८ जुलै २०२२ रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान तसेच कार्यालयांवर छापेमारी केली होती. तसेच संजय पांडे, त्यांच्या कंपनीचे सध्याचे संचालक संतोष पांडे (संजय पांडे यांची आई), अर्मान पांडे (संजय पांडे यांचा मुलगा) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ८ जुलै रोजी सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पांडे यांच्या कंपनीतून सर्व्हर, २५ लॅपटॉप, काही डेस्कटॉप संगणक ताब्यात घेतले होते.

Web Title: An hour and a half meeting between Uddhav Thackeray and former Police Commissioner Sanjay Pandey on 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.