मुंबई :
मुंबई महापालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या लोअर परळ पुलाचे काम बोंबलले आहे. पुलाच्या कामाला दिरंगाई होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. तीन ते साडेतीन वर्षे होऊन देखील हे काम धिम्या गतीने होत असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त करत दहा मिनिटांच्या प्रवासाला तास लागत असल्याचे सांगितले. तसेच या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी २०२३ उजाडण्याची शक्यता व्यक्त केली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी डिलाईल रोड रेल्वे पुलाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, पुलाच्या कामाच्या दिरंगाईबाबत स्थानिक कृष्णकांत नलगे यांनी नाराजी व्यक्त करत तक्रारींचा पाढा वाचला. ते म्हणाले तीन ते साडेतीन वर्षे झाली हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मुंबई महापालिका, रेल्वे यांनी या कामाला विलंब केला. मुळात करीरोड आणि चिंचपोकळी येथील रेल्वे पुलाचे काम हाती घेणे गरजेचे होते.मात्र प्रशासकीय यंत्रणेने लोअर परळ पुलाचे काम हाती घेतले; पण ते देखील वेळेवर पूर्ण होत नाही.
रेल्वे आणि महापालिका यांच्या विलंबाचा फटका स्थानिकांना बसत आहे. पालिकेत सत्तेवर असून देखील कामे वेळेवर पूर्ण करता येत नाहीत हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. एकमेकांकडे बोटे दाखविण्यापेक्षा ही कामे वेळेत पूर्ण करता आली असती तर स्थानिकांना याचा फटका बसला नसता. - मिलिंद पांचाळ, मनसे