मागाठाणे - गोरेगाव डीपी रस्त्यातील महत्वाचा अडथळा दूर
By मनोहर कुंभेजकर | Published: July 25, 2023 02:40 PM2023-07-25T14:40:15+5:302023-07-25T14:40:48+5:30
आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई - मागाठणे ते गोरेगाव व्हाया लोखंडवाला संकुल हा १२० फुटी डीपी १९९१ पासून प्रलंबित आहे. आज सिंग इस्टेट येथील भिंत पाडण्यात आल्यामुळे या मार्गातील महत्वाचा अडथळा दूर झाला आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार व भाजप नेते आमदार अतुल भातखळकर हे या मार्गासाठी २०१४ पासून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागाठाणे- गोरेगाव डीपी रोडचा मुद्दा आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मंगळवारी सिंग इस्टेटची भिंत पाडण्यात आल्यामुळे हा रस्ता लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने मागाठाणे-गोरेगाव मार्गाचे नियोजन करण्यात आले. या प्रस्तावित रस्त्यावरील घरांच्या पुनर्वसनासाठी आता पर्यायी सदनिका तयार आहेत. राज्य सरकारने सुद्धा हा डीपी रोड पूर्ण करण्याचे मनावर घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता आता लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असे आमदार अतुल भातखळकर यांनी लोकमतला सांगितले.