मुख्यमंत्रिपदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:34 AM2024-11-26T09:34:19+5:302024-11-26T09:35:07+5:30
आपल्यासोबत असलेल्या आमदारांनी वेगळा विचार करू नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतल्याचं दिसत आहे.
Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री करण्याचं निश्चित केल्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची चर्चा आहे. अशातच आपल्यासोबत असलेल्या आमदारांनी वेगळा विचार करू नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतल्याचं दिसत आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांकडून शपथपत्रे लिहून घेतल्याचे समजते.
महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत दोन राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडली आणि सत्तासमीकरण बदलले. आता विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा फुटीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांकडून शपथपत्रे घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून शपथपत्रे घेतली आहेत.
उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय घडलं?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे २० आमदार निवडून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी 'मातोश्री'वर या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात आली. नवनिर्वाचित आमदारांसह पक्षाचे विधान परिषद सदस्य तसेच खासदार या बैठकीला उपस्थित होते. विधिमंडळ आणि विधानसभेतील नेत्यांची निवड बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र देखील लिहून घेण्यात आले.
विधिमंडळाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना असून, त्यांचा निर्णय बंधनकारक राहणार असल्याचे या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना शपथपत्राची प्रक्रिया ही विधिमंडळाच्या नियमानुसार नेहमीची आहे. या प्रक्रियेत नवीन काही नाही, सर्व पक्षांना ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते, असे सांगितले. या बैठकीला खासदार तथा सचिव अनिल देसाई, नेते सुभाष देसाई, संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.