केअरटेकरनेच केली वयोवृद्धाची हत्या, सांताक्रुझमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:53 AM2023-05-09T05:53:04+5:302023-05-09T05:54:31+5:30
घरातील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
मुंबई : सांताक्रूझमध्ये वयोवृद्ध आजोबांची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकरने लुटीच्या उद्देशाने हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. घरातील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी कृष्णा पेरियार (३०) याच्याविरोधात सांताक्रूझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
या हल्ल्यात मुरलीधर नाईक यांचा मृत्यू झाला. सांताक्रूज परिसरात नाईक हे पत्नीसोबत राहत होते. दोघांचा सांभाळ करण्यासाठी कृष्णा हा केअरटेकर म्हणून काम करत होता. सकाळी कृष्णाने मुरलीधर यांची गळा आवळून हत्या करून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुरलीधर यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत म्हणून जाहीर करण्यात आले. हत्येनंतर कपाटातील रक्कम आणि दागिने चोरीस गेल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पोलिसांसह गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने त्यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आहे.
नाईक यांच्यासोबत राहायचा....
मुरलीधर यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते मुंबईच्या विलेपार्ले, चेंबूर आणि नवी मुंबई भागात राहतात. त्यांच्या देखभालीसाठी केअरटेकर आणि स्वयंपाकासाठी एका महिलेला ठेवण्यात आले होते. मोलकरीण स्वयंपाक आणि साफसफाई करून निघून जायची. तर, केअरटेकर हा तेथेच राहण्यास होता. तो नाईक यांच्यासोबतच बेडरूममध्ये झोपायचा.