अनैतिक संबंधांचा संशय, चिमुकल्याचा गळा आवळला; मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 11:48 AM2023-11-13T11:48:19+5:302023-11-13T11:48:27+5:30
धारावीत परिसरात राहणारा अवान एजाज शेख (६) यामध्ये गंभीर जखमी असून त्याच्यावर सायनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मुंबई : वडिलांच्या अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीने चिमुकल्याचे अपहरण करत हत्येचा प्रयत्न केल्याची घटना धारावीत घडली. याप्रकरणी मोहम्मद नजीब वसीउल रेहमान शेख (३७) याला अटक केली आहे. धारावीत परिसरात राहणारा अवान एजाज शेख (६) यामध्ये गंभीर जखमी असून त्याच्यावर सायनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
१० तारखेला गल्लीत मुलांसोबत खेळण्यासाठी बाहेर पडला. बराच वेळ उलटूनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, काहीच थांगपत्ता न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. नजीब कनेक्शन समोर येताच पोलिसांनी त्यानुसार शोध सुरू केला. अवान याच्या वडिलांचे नजीबच्या पत्नीसोबत अनैतिक प्रेम संबंध असल्याचा नजीबला संशय होता. याच रागात त्याने अवानच्या वडिलांना धडा शिकविण्यासाठी त्याचे अपहरण करत त्याला ट्रेनने निर्जन स्थळी नेले.
चिमुकला अजूनही मानसिक धक्क्यात
तेथे त्याला बेल्टने मारहाण करत त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांमुळे मुलाची सुटका झाली. पोलिसांनी आरोपीला रविवारी पहाटे अटक केली आहे. मुलाच्या डोळ्यावर, नाकावर, मानेवर जखमा असून सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेने चिमुकला मानसिक धक्क्यात आहे. त्याच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे.