Join us  

‘मेट्रो ४’च्या खर्चात ४६३ कोटी रुपयांची वाढ; बैठकीत वाढीव खर्चाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 9:22 AM

मेट्रो ४ ही मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची असून त्यावर ३० स्थानके असणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वडाळा-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या खर्चात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या तीन पॅकेजचा खर्च तब्बल ४६३ कोटींनी वाढला आहे. यामध्ये मेट्रो मार्गिकेचे रखडलेले काम, तसेच प्रकल्पाच्या मूळ कामात झालेला बदल ही कारणे दिली जात आहेत. एमएमआरडीए कार्यकारी समितीच्या  बैठकीत या वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो ४ ही मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची असून त्यावर ३० स्थानके असणार आहेत.

एमएमआरडीएच्या २०१८ मधील नियोजनानुसार या मार्गिकेच्या कामासाठी सुमारे १४,५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या मेट्रोचे काम एकूण ५ पॅकेजमध्ये सुरू असून प्रकल्पाचे काम रखडलेल्या तीन पॅकेजच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. एमएमआरडीएने २०१८ मध्ये या तीन पॅकेजचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले होते. मात्र कोरोनामुळे लागू केलेली टाळेबंदी, कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने थांबवलेले काम यामुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यामुळे या तीन पॅकेजच्या कामासाठी एमएमआरडीएने उपकंत्राटदाराची नेमणूक केली होती.

मेट्रोचे काम पूर्ण होण्यासाठी २०२६ उजाडणार- या प्रकल्पाच्या कामालाही चांगलाच विलंब झाला आहे. या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होऊन जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. सध्या मेट्रो मार्गिकेचे सुमारे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. - त्यातून या मेट्रोचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी २०२६ उजाडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी जवळपास दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने ठाणे ते मुंबई मेट्रो प्रवासासाठी आणखी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :मेट्रोमुंबई