Join us

निवासी डॉक्टरांना ‘बूस्टर’! महापालिकेकडून विद्यावेतनात दहा हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 7:38 AM

ऑगस्ट महिन्यापासून मिळणाऱ्या वेतनात ही वाढ करण्यात येणार आहे. त्यासोबतच पाच महिन्यांची थकबाकीसुद्धा देण्यात येणार आहे.  विद्यावेतनवाढीच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त २९ कोटींचा भार येणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या प्रमुख चार रुग्णालयांतील निवासी डॉक्टर संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी २२ जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. त्याची गंभीर दखल घेत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यापासून मिळणाऱ्या वेतनात ही वाढ करण्यात येणार आहे. त्यासोबतच पाच महिन्यांची थकबाकीसुद्धा देण्यात येणार आहे.  विद्यावेतनवाढीच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त २९ कोटींचा भार येणार असल्याचे सांगण्यात येते.

केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना पुरेशी वसतिगृहे, विद्यावेतनात वाढ आणि महागाई भत्तावाढ आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टर संघटनेने  २२ जुलैला सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

विशेष म्हणजे निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना रुग्णालयाच्या खात्यामधून महागाई भत्ता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. शिवाय, नवीन वसतिगृहे बांधण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

निवासी डॉक्टर भूमिकेवर ठाम 

महापालिका रुग्णालय निवासी डॉक्टर संघटनेचे सरचिटणीस डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करीत आहोत. आम्हाला लिखित स्वरूपात ठोस आश्वासन दिले जात नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही सामूहिक रजेचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना २४ ते ४८ तास आधी देऊ.

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक

आहे. विद्यावेतनवाढीची मागणी पूर्ण केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांप्रमाणे त्यांचे विद्यावेतन करण्यात आले आहे. अन्य मागण्यासुद्धा पूर्ण करत आहोत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आता सामूहिक रजेवर जाण्याची गरज नाही. 

- डॉ. नीलम अंड्राडे, संचालक, मुंबई महापालिका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये

टॅग्स :मुंबईडॉक्टर