"एक लाख नोकऱ्या देणारा उद्योग राज्याबाहेर, पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला’’ जयंत पाटील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:48 PM2022-09-13T15:48:33+5:302022-09-13T15:49:23+5:30
Jayant Patil: तब्बल एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण करणारा उद्योग महाराष्ट्राच्या हातून निसटल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.
मुंबई - तब्बल एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण करणारा उद्योग महाराष्ट्राच्या हातून निसटल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. एक लाख नोकऱ्या देणारा उद्योग राज्याबाहेर गेला आहे. पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले की, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
गुजरातच्या निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?, अशी विचारणा पाटील यांनी केली आहे.