राज्यात लेदर व्यवसाय वाढीसाठी विकास महामंडळाचा पुढाकार, देवनार लेदर पार्क उभारणार
By सचिन लुंगसे | Published: September 6, 2023 03:37 PM2023-09-06T15:37:35+5:302023-09-06T15:39:53+5:30
मुंबई : राज्यात लेदर व्यवसाय वाढीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत ...
मुंबई : राज्यात लेदर व्यवसाय वाढीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून देशातील अन्य राज्यांप्रमाणे राज्यातही क्लस्टर धोरण असावे यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली. तसेच मुंबई देवनार येथे २ एकर क्षेत्रावर महामंडळाच्या माध्यमातून लेदर पार्क उभारण्यात येत असून त्याबाबतची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
इंडियन फुटवेअर कंपोनंस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IFCOMA) यांच्या वतीने मुंबई येथे नुकतेच दोन दिवसाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी चर्मोद्योग निर्यातदार यांच्या बैठकीचे आयोजन महामंडळाच्या वतीने करण्यात आले होते त्याप्रसंगी श्री गजभिये बोलत होते.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन इंडियन फुटवेअर कंपोनंस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IFCOMA) चे पश्चिम विभागाचे चेअरमन तथा राम फॅशन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड.चे व्यवस्थापकीय संचालक नरेश बसीन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट चेन्नईचे कार्यकारी संचालक आर सेलव्हम (भा.प्र.से), संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट चे सचिव पंकज कुमार सिन्हा, मलिक ट्रेडर्स मुंबईचे एच आर मलिक, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सदर प्रदर्शनाच्या अनुषंगाने कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट यांनी चर्मद्योग व्यवसायातील उद्योजकांची तसेच निर्यातदारांची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस देशभरातील 70 उद्योजक तसेच निर्यातदार उपस्थित होते. संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी मौजे रातवड तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे मेगा लेदर फुटवेअर अँड ॲक्सेसरीज क्लस्टर बाबत यावेळी उपस्थित त्यांना माहिती करून दिली. राज्यात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्म विकास महामंडळाच्या वतीने लेदर व्यवसायाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद केले.