Join us

श्री शिवाजी मंदिरमध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा अभिनव उपक्रम

By संजय घावरे | Published: May 06, 2024 3:57 PM

Mumbai News: दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाने ३ मे रोजी आपल्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आहे. 

मुंबई - दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाने ३ मे रोजी आपल्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आहे. 

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला. साठाव्या वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने नाट्यरसिक आणि रंगकर्मींसाठी शिवाजी मंदिरने एक आगळी वेगळी भेट दिली आहे. आता प्रायोगिक नाटक, एकांकिका यासाठी शिवाजी मंदिर उपलब्ध करून देण्यात येणार आहेच, पण प्रयोग सादर करणाऱ्या संस्थेला ट्रस्टकडून १० हजार रुपयांचे अर्थ सहाय्यसुद्धा दिले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, प्रशिक्षक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार घालून केले. यावेळी रंगमंचावर मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, विश्वस्त ज्ञानेश महाराव, संचालक मंडळ सदस्य राजेश नरे व रवींद्र सुर्वे हे उपस्थित होते. शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित 'आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ' या प्रायोगिक नाटकाद्वारे या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. 

श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे ६० व्या वर्षात पदार्पण होताना संचालक मंडळाने नाट्यसृष्टीला नवीन विषय व मोठ्या प्रमाणात रंगकर्मी देणाऱ्या प्रायोगिक, हौशी नाटक, एकांकिका (एका वेळी दोन) आणि कला विषयक कार्यक्रम यांना १० हजार रुपयांचा सहयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी दर आठवड्याला सोमवारी संध्याकाळी ७.३० ते १०.३० हि वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास मंगळवार किंवा गुरुवारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित नाट्य प्रयोगाचे तिकीट दरही मर्यादित असतील.

यावेळी केंद्रे म्हणाले की, छबिलदास ही प्रायोगिक रंगभूमीची चळवळ माहीम येथे स्थलांतरित झाली खरी; पण दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही चळवळ पुन्हा जोमाने वाढावी, यासाठी शिवाजी मंदिरने सुरू केलेल्या हा उपक्रम आजच्या काळात आवश्यक आहे. तो सुरू केल्याबद्दल मी सर्व रंगकर्मींतर्फे विश्वस्त मंडळाचे आभार मानतो. यातून मराठी रंगभूमीला नवीन लेखक, दिग्दर्शक, कलावंत मिळतीलच; तसेच नवीन - दुर्लक्षित विषयही रंगभूमीवर येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ हे सर्व रंगकर्मींच्या पाठीशी ठामपणे उभे असून, भविष्यातही असे अनेक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.

टॅग्स :नाटकमुंबई