मुंबई : गोरेगावमधील जय भवानी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने आठ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पालिका उपायुक्त विश्वास शंकरराव, परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे रमा मिटकर, पालिकेच्या पी-दक्षिण वॉर्डाचे वॉर्ड अधिकारी राजेश आकरे, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, पालिकेच्या चौकशी विभागाचे एस. बी. सातवळेकर आणि म्हाडाचे उपअभियंता राजीव सेठ यांचा समावेश आहे. आग लागण्याचे कारण, दुर्घटनेस जबाबदार कोण, इमारतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव होता का, याबाबत समिती चौकशी करेल. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना सुचविण्यास समितीला सांगण्यात आले आहे.
13 जणांना डिस्चार्ज -गोरेगावच्या जय भवानी इमारतीत लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणि विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या आगीत एकूण ६९ जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक जखमी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल आहेत. येथे उपचार घेत असलेल्या ४३ जखमींपैकी ९ जणांना घरी सोडण्यात आले. कूपरमधील १६ जखमींपैकी दोघांना घरी सोडण्यात आले आहे. तर गोरेगावच्या मातोश्री गोमती रुग्णालयातील नऊपैकी दोघांना घरी सोडण्यात आले आहे.
उरात आगीच्या जखमा...- गोरेगावमधील जय भवानी इमारतीच्या दुर्घटनेमुळे अनेक रहिवासी हादरले आहेत. रहिवासी भेदरलेले आहेत. - मृत्यूच्या रूपात पसरत असलेल्या आगीतून कसाबसा जीव वाचवलेल्या नागरिकांच्या उरात धडकी भरली आहे. त्यांना घरी जाण्यासही भीती वाटत आहे. - या आगीत जखमी झालेल्या अनेकांच्या जखमा उपचाराअंती बऱ्या झाल्या आहेत. मात्र, या आगीने रहिवाशांच्या उरात कायमच्या जखमा केल्याचे निदर्शनास आले.