मुंबई : उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा ८६ टक्के अधिक मालमत्ता जमा करणाऱ्या आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. त्याच्याकडे एकूण ७ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमाविलेल्या पैशातून या अधिकाऱ्याने तीन मजली इमारत बांधल्याचा ठपका देखील सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे.
या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २००८ ते २०१८ या कालावधीमध्ये मोरादाबाद येथे आयकर विभागात सहायक आयुक्त, उपायुक्त, सह-आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अशा विविध पदांवर कार्यरत असलेल्या अमित निगम या अधिकाऱ्याने अवैधरित्या संपत्ती जमा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सीबीआयने केलेल्या चौकशीत त्याची एकूण अवैध मालमत्ता ७ कोटी ५२ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले.