Join us

चहाला बोलावत वृद्धेची हत्या करून जाळले; मेहंदीच्या केसांवरून आराेपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 1:58 PM

पोलिसांनी कशी लढविली युक्ती, वाचा सविस्तर...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वडाळा परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यास वडाळा पोलिसांना यश आले. केसांना लावलेल्या मेहंदीने महिलेची ओळख पटली. चौकशीअंती परिसरात राहणाऱ्या तरुणानेच लुटीच्या उद्देशाने महिलेची हत्या करीत मृतदेह जाळल्याचे समोर आले. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी मोहमद फैज रफीक सय्यद ऊर्फ बाबा (वय २७) याला बेड्या ठोकल्या आहेत. चहा पिण्याच्या बहाण्याने महिलेला घरात बोलावून तिचा काटा काढल्याचे समोर आले.

सुग्राबी हुसेन मुल्ला (७१) असे मृत महिलेचे नाव आहे. २६ ऑक्टोबरला  बीपीटी प्रवेशद्वार क्रमांक ४ व ५ च्या दरम्यान जळालेल्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा होत्या. याशिवाय हाताचे दोन्ही कोपर आणि पायाचे गुडघे तुटलेले होते. शरीर पूर्ण जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. हत्येचा गुन्हा नोंदवत, वडाळा पोलिस ठाण्याचे वपाेनि मिलिंद जाधव मार्गदर्शनाखाली वडाळा, शिवडी पोलिसांची १२ पथके तयार करण्यात आली होती.

पोलिसांनी अशी लढविली युक्ती

परिसरातील बेपत्ता महिलांबाबतची माहिती घेण्यात आली. त्यावेळी महिलेच्या अंगावरील दागिने आणि छायाचित्र दाखवून शोध घेण्यात आला. त्यावेळी शहीद भगतसिंग रोड, चिंधी गल्ली येथील इंटर्नल दोस्ती सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेकडे काम करणारी सुग्राबी हुसेन मुल्ला  तीन ते चार दिवसांपासून कामावर येत नसल्याची माहिती मिळाली. तसेच मृतदेहाच्या डोक्यावरील केसांच्या रंगावरून महिलेला मेहंदी लावण्याची सवय असल्याने तो मृतदेह त्यांचाच असल्याचा संशय बळावला.

दागिने पाहून फिरली नियत

मोहम्मद हा मुल्ला यांच्या ओळखीचा होता. त्यांच्या अंगावरील दागिने पाहून त्याची नियत फिरली. तिच्या डोक्यात लोखंडी सळी मारल्याने ती जमिनीवर पडल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने दागिने काढून घेतले व मृतदेह गोणीमध्ये ठेवून राहत्या घराच्या पहिल्या माळ्यावरील खिडकीतून बाहेर फेकला. तसेच महिलेची ओळख पटू नये यासाठी त्याने ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळला.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी