हसतखेळत विज्ञानातून माणसे जोडणारी संस्था!
By सचिन लुंगसे | Published: April 10, 2023 09:28 AM2023-04-10T09:28:49+5:302023-04-10T09:29:02+5:30
आजवर संस्थेने मुंबईसह राज्यात हसतखेळत विज्ञान शिकवत माणसे, वैज्ञानिक संस्था जोडण्याचे काम केले आहे.
विद्यार्थ्यांसह नागरिकांना विज्ञान, तंत्रज्ञानाची गोड लागावी, विज्ञान सोप्या भाषेत समजावे, प्रयोग करता यावे, काहीतरी नवे शिकता यावे आणि मानवाच्या उत्क्रांतीपासून माणूस चंद्रावर पोहोचल्यापर्यंतच्या खगोल घटनांचा आस्वाद घेता यावा म्हणून वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ही संस्था ११ नोव्हेंबर १९८५ पासून विज्ञानाचा जागर करीत आहे. नेहरू सायन्स सेंटर ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था असून, आजवर संस्थेने मुंबईसह राज्यात हसतखेळत विज्ञान शिकवत माणसे, वैज्ञानिक संस्था जोडण्याचे काम केले आहे.
नेहरू सायन्स सेंटरमध्ये विज्ञान उद्यान, विविध गॅलरींमध्ये ऊर्जा, ध्वनी, किनेमॅटिक्स, यांत्रिकी, वाहतूक आदींवरील ५००हून अधिक हँड-ऑन आणि परस्पर संवादी विज्ञान प्रदर्शने आहेत. अनोख्या वास्तुकलेसह इमारतीमध्ये विविध थीमवर अनेक कायमस्वरूपी विज्ञान प्रदर्शने आहेत. त्यांची देशभरात २५ विज्ञान केंद्र / संग्रहालये आहेत. विज्ञान प्रदर्शन आणि इतर संबंधित शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रमांची संकल्पना, रचना, विकास आणि आयोजन करण्यासाठी यामध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. प्रत्येकाला आपलेसे करत सोप्या भाषेत विज्ञान सांगण्याचे कसब संस्थेकडे असून, उन्हाळी सुटीत संस्थेत विज्ञानाची जत्राच भरते.
विकास केंद्र
विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, तरुण उद्योजक, तंत्रज्ञ, अपंग, गृहिणी आणि इतरांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या विशिष्ट विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यापीठे, तांत्रिक संस्था, संग्रहालये, शाळा आणि महाविद्यालये किंवा इतर संस्थांना विज्ञान संग्रहालयांचे नियोजन आणि आयोजन करण्यासाठी मदत केली जाते. विज्ञान प्रदर्शने आणि प्रात्यक्षिक सहायकांच्या विकासासाठी केंद्र स्थापन केली जातात.
ग्रामीण भागात विज्ञान
प्रदर्शने, चर्चासत्रे, व्याख्याने, विज्ञान शिबिरे आणि इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरी, ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि सर्जनशीलतेची भावना वाढविण्यासाठी विविध शाळाबाह्य शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
तुम्हाला विज्ञानाची आवड असेल, जिज्ञासू मन असेल किंवा या उन्हाळ्यात काहीतरी नवीन आणि रोमांचक शिकायचे असेल तर संस्थेकडे आवडीनुसार कार्यशाळा आहेत. कार्यशाळा प्रेरणा देण्यासाठी आणि आव्हान देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुम्हाला विज्ञान अधिक मनोरंजनात्मक पद्धतीने शिकता येईल. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्टीतील क्रिएटिव्ह सायन्स कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळांसाठी नोंदणी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे.
- एस. एम. बानी, लायब्ररी ऑफिसर, नेहरू सायन्स सेंटर
विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगितले जाते. प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. उन्हाळी कार्यशाळांसोबत वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. कुटुंबासमवेत विज्ञानाचा आनंद लुटता यावा म्हणून प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.
- राजेश रहांगदळे, एज्युकेशन असिटंट, नेहरू सायन्स सेंटर