मुंबई: मुंबईत सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याचदरम्यान आज विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसल्याची तक्रार सभागृहातील सदस्यांनी केली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आमदारांनी एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये ही तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित प्रकारामुळे विधान भवनातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
विधानपरिषदेत अज्ञात व्यक्ती बसल्याची तक्रार आमदारांकडून करण्यात आली आहे. आज दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं आमदारांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. आमदारांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, एक अज्ञात व्यक्ती विधानपरिषदेमध्ये आमदार ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी येऊन बसला होता. या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदारांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना एक लेखी तक्रार दिली आहे.
सदर प्रकरणामुळे विधीमंडळातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचीही चिंता या आमदारांनी व्यक्त केली आहे. एखादा व्यक्ती सभागृहात येऊच कसा शकतो अशी विचारणा या आमदारांनी केली आहे. सभागृहाच्या दरवाज्यावर मार्शल्स असतात आणि ते या आमदारांना ओळखतात. तरीही एक अज्ञात व्यक्ती सभागृहात कशी येऊ शकते असाही प्रश्न विचारला जात आहे.