"महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 07:17 PM2024-01-08T19:17:42+5:302024-01-08T19:17:52+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शरद पवार यांच्याकडे मागणी

An urgent meeting of all the t parties of the India Alliance in Maharashtra should be held | "महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी"

"महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी"

मुंबई : भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घ्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. भाकपच्या शिष्टमंडळाने आज पवार यांची भेट घेऊन याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्त केले. शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ प्रकाश रेड्डी, मुंबई सेक्रेटरी कॉ मिलिंद रानडे व राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ अशोक सुर्यवंशी यांचा सहभाग होता.

या पत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे, की भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित मिटिंग होणे आवश्यक आहे, राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांशी विचारविनिमय होणे आवश्यक आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्रात परभणी व शिर्डी अशा लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची तयारी केली आहे; तसेच इतर घटक पक्षांनीही काही विचार केला असेलच. भाकपने परभणीतून कॉ. राजन क्षीरसागर व शिर्डीतून कॉ.ॲड. बन्सी सातपुते यांचे नाव निश्चित केले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी व राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनीती आखली पाहिजे. राज्यातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचा पराभव करू शकतात असा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या राज्यातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने मिटिंग घेण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे श्री. पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.  

यावेळी श्री. शरद पवार यांनी आठवड्याभरात राज्यातील इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सांगून, या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षासह अन्य डाव्या पक्षांना निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. यावेळी देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवरही विस्ताराने चर्चा करण्यात आली.

Web Title: An urgent meeting of all the t parties of the India Alliance in Maharashtra should be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.