वाढवण बंदर मोठ्या जहाजांसाठी उपयुक्त; मच्छीमारांना सोबत घेऊनच विकास : फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:03 AM2023-10-20T06:03:04+5:302023-10-20T06:03:18+5:30
वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमार तसेच गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. याविरोधात वारंवार आंदोलनेही केली जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सागरी क्षेत्राची क्षमता महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील वाढवण बंदरामुळे सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात मोठे आश्वासक बदल होतील. वाढवण बंदर मोठ्या जहाजांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तेथील मच्छीमार बांधवांना सोबत घेऊनच येथे विकास करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी तिसऱ्या ग्लोबल मेरिटाइम इंडियाच्या समारोपावेळी म्हणाले.
वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमार तसेच गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. याविरोधात वारंवार आंदोलनेही केली जात आहेत. केंद्रिय स्तरावर या बंदरासाठी पर्यावरणीय परवानग्या मिळाल्यानंतर हे बंदर उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मेरिटाइम इंडियाच्या समिटमध्ये फडणवीस म्हणाले, वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार असून त्यामुळे राज्याचा सर्वसमावेशक विकास साध्य होण्यास मदत होईल. भारतात शीप बिल्डिंग क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. राज्यातही यासंदर्भातील धोरण तयार करण्यात आले असून या क्षेत्रासाठी आवश्यक इको सिस्टिम तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धताही आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूकीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. राज्यात शीप बिल्डिंग क्षेत्रालाही भक्कम आधार दिला जाईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय जहाज आणि बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय जहाज आणि बंदरे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री मंत्री शंतनू ठाकूर, केंद्रीय आयुष मंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई , बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे, खासदार गोपाळ शेट्टी हे उपस्थित होते.
जेएनपीटीपेक्षा क्षमता तिप्पट
सध्या देशातील सुमारे ६५ टक्के कंटेनर वाहतूक ही 'जेएनपीटी' बंदरातून केली जाते. वाढवण बंदराची क्षमता त्याच्या तिप्पट असून मोठय़ा जहाजांसाठी आवश्यक अशी समुद्राची सर्वाधिक खोली (शॅफ्ट) वाढवण बंदरात उपलब्ध आहे. वाढवण बंदर मोठ्या जहाजांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तेथील मच्छीमार बांधवांना सोबत घेऊनच येथे विकास करण्यात येईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री