Join us

‘अनादि मी, अनंत मी...अथांग सावरकर!’ मध्ये रंगले श्रोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:19 AM

‘अथांग सावरकर’ या तीन दिवसीय अनोख्या सोहळ्यात सावरकरांच्या ‘अनादी मी, अनंत मी’चे खरे दर्शन हजारो बोरीवलीकरांना घडले.

मुंबई : ‘अथांग सावरकर’ या तीन दिवसीय अनोख्या सोहळ्यात सावरकरांच्या ‘अनादी मी, अनंत मी’चे खरे दर्शन हजारो बोरीवलीकरांना घडले. पोयसर जिमखाना आणि स्वा. सावरकर उद्यान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी संध्याकाळी बोरीवलीत आयोजित या भव्यदिव्य कार्यक्रमाचे लोकमत माध्यम प्रायोजक होते. कार्यक्रमाच्या चैतन्याने तसेच सळसळणाऱ्या देशभक्तीने या वेळी उपस्थित हजारो श्रोते न्हाऊन निघाले.स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गेली बारा वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे ‘बारा वर्षे पूर्ण करून एक तपच आम्ही पूर्ण केले’ या भाषेत कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार गोपाळ शेट्टी यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. शनिवारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेते तन्वी गोंडे आणि अमेय परांजपे यांचा गौरव शेट्टी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला. सावरकरांचे स्वीय सचिव यांचे नातू स्वप्निल सावरकर यांनी सावरकरांचे सैनिकीकरणाबाबतचे विचार तसेच त्यांच्याबाबतचे अनेक प्रेरणादायी किस्से आणि अनुभव श्रोत्यांना शनिवारी स्पर्धेदरम्यान ऐकवले.रविवारी, २७ मे रोजी ‘मानवी कासुंबीनो रंग डायरो’ या गुजराथी लोकसंगीताचा कार्यक्रम पार पडला. सोमवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्वस्वी कामगिरी केल्याबाबत अ‍ॅड. जयप्रकाश मिश्र, शिल्पकार उत्तम पाचारणे, बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खटाव, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे, अमोल सुत्राळे, नारायण मुंडले, मेहजबीन शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गेले सहा महिने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणाºया स्वा. सावरकर उद्यान समितीचे प्रमुख नितीन प्रधान आणि महेश राऊत, दीपक पाटणेकर, प्रकाश दळवी, सुनील मोहिते, राजेश भट्ट, नैनेश शाह, किशोर चित्राव, अमोल सुत्राळे, अजय राज पुरोहित, भूपेंद्र शाह यांनी परिश्रम घेतले होते.त्यानंतर ‘अथांग सावरकर’ या महानाट्याचे सादरीकरण प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे, अविनाश नारकर, रविराज पराडकर, ऐश्वर्या नारकर, गायिका सुचित्रा भागवत, नंदेश उमप, श्रीरंग भावे या कलाकारांनी केले. या वेळी कोणतेही व्यख्यान न ठेवता सावरकर यांची देशभक्ती, देशप्रेम आणि त्यासाठी त्यांनी सहन केलेल्या यातना त्यांच्याच साहित्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केला. ज्यात लावणी, पटका, पोवाडा याचा समावेश होता. सावरकरांनी लिहिलेली तीन नाटके आणि २२ हजार पृष्ठांच्या साहित्याचा या वेळी आवर्जून उल्लेख पोंक्षे यांनी केला. सावरकरांबाबत हिंदुहृदयसम्राट बाळ ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, पु.ल. देशपांडे, नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया याप्रसंगी मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आल्या.‘लोकमत’ने हिंमत दाखवली !एक मराठी नामांकित वर्तमानपत्र मी कधी नव्हे ते तीन वेळा वाचले. मात्र त्यात सावरकरांबाबत एकही ओळ कुठे दिसली नाही. तेव्हा त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात मी फोन करून याबाबत जाब विचारला आणि हीच हिंमत २ आॅक्टोबर रोजी करून दाखवा, असेही ठणकावून सांगत फोन ठेवल्याचे पोंक्षे यांनी या वेळी सांगितले. तसेच फक्त ‘लोकमत’ने सावरकरांबाबत लिहिण्याची हिंमत दाखवल्याचे कौतुक केले. गोपाळ शेट्टी यांनीही पोंक्षे यांच्या वक्तव्याला दुजोरा देत ‘लोकमत’ची पाठ थोपटली.