मुंबई - राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या, नेहमी हसतमुख राहत संवाद साधणाऱ्या तर कधी आक्रमकपणे विरोधकांना भिडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या जीवनातही काही हळवे कोपरे असतात. त्याचा उल्लेख केल्यावर तेही आपल्या भावना व्यक्त केल्याशिवाय राहू शकत नाहीत. राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे ठाण्यातील प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अत्यंत दु:खद घटनेच्या आठवणी समोर आल्यावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
एबीपी माझावर आयोजित महामाझा कट्टा या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. पुढच्याच आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर या आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारणारा अभितेता प्रसाद ओक हाही सहभागी झाला होता. यावेळी आनंद दिघे यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलांसोबत घडलेल्या दुर्घटनेचा उल्लेख केला. त्या दुर्घटनेत एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता.
त्याबाबतची आठवण जागवताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ती आठवण व्यक्त करणं माझ्यासाठी अवघड आहे आहे. माझ्या दोन मुलांचा अपघात झाला होता. त्यानंतर माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. माझी दोन मुलं खेळत होती. बोटिंग करत होती. तेवढ्यात ही दुर्घटना घडली. तो माझ्या जीवनातील सर्वात काळा दिवस होता. श्रीकांत तेव्हा १४ वर्षांचा होता. तर त्याची भावंड दीपेश आणि शुभदा त्या दुर्घटनेत देवाघरी गेली. त्यांना वाचवता आलं नाही. २००० सालची ही घटना आहे. त्यावेळी शुभदा ७ वर्षांची होती. तर दीपेश ११ वर्षांचा होता. या घटनेमुळे माझ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी श्रीकांत पण लहान आणि त्याची आई. या दुर्घटनेमुळे माझ्याकडे काही राहिलंच नव्हतं, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, तेव्हा त्या कठीण काळात मी कुटुंबासोबत राहायचं ठरवलं होतं. सगळेच कोलमडले होते. परिस्थिती अशी होती की, मला रडताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं भावना व्यक्त करणेही कठीण झालं होतं. तेव्हा आनंद दिघे साहेब एक दिवस आड मला भेटायला यायचे. मला म्हणायचे काय करतोस? मी म्हणायचो आता मी काही करूच शकत नाही. तेव्हा त्यांनी मला समजावलं. मी ठाण्याला आल्यावर दिघेसाहेब माझ्या पाठीमागे उभे राहिले. आज जो काही मी आज तुमच्यासमोर उभा आहे, तो दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे, त्यांनी पाठबळ दिलं त्यामुळे आहे, असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले.
तेव्हा दिघे साहेबांना मी म्हणालो होतो की, आता मी कुटुंबासोबत राहतो. त्यांना माझी गरज आहे. तेव्हा दिघे साहेबांनी सांगितले की, तुझी समाजालाही गरज आहे. समाजासाठी काम कर, तुझं कुटुंब एवढं छोटं नाही. खूप मोठं आहे. तेव्हा मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतली. त्यानंतर मी कुटुंबासह वैष्णौदेवीला जाऊन आलो. पुन्हा आल्यावर त्यांनी मला ठाणे महानगरपालिकेमध्ये सभागृहनेतेपदाची जबाबदारी दिली. मी कामात व्यस्त राहावं, अशी त्यांचा हेतू होता. त्यानंतर विविध ठिकाणी कार्यक्रमांसाठी पाठवायचे. अवघड कामे सांगायचे. माझी परीक्षा घ्यायचे. अनेक प्रलंबित कामं मार्गी लावली, त्यामुळे कौतुक करायचे. सभागृह नेत्याचं कार्यालय १० वाजेपर्यंत सुरू असायचं. माझ्या कामाचा दिघेसाहेब आढावा घ्यायचे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.