जिगरबाज मयूर शेळकेंना रेल्वेकडून 50 हजार तर जावाकडून बाईक, आनंद महिंद्रांनीही केलंय ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:42 PM2021-04-21T18:42:52+5:302021-04-21T21:19:07+5:30
वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईंटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला
मुंबई - नवी मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकावरील पॉइंटमनने प्रसंगावधानता दाखवत एका अंधमातेच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. मयूर शेळकेंच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मयूर यांच्या बहादूर कामगिरीला सॅल्यूट करण्यात येत आहे. आता, शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलंय.
वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईंटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. तर, दुसरीकडे ज्या अंध मातेच्या बाबतीत ही घटना घडली त्या मातेनंही मयूरच्या धाडसाचं कौतुक केलंय. मयूर शेळकेमुळेच आज माझा मुलगा माझ्याजवळ आहे. मयूर यांना एखादा पुरस्कार आणि गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी संगिता शिरसाट या अंध मातेनं केली होती. या अंधमातेच्या मागणीला यश आलं असून मयूर यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत आहे.
मयूर शेळके यांचा रेल्वे विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे. तसेच, 50 हजार रुपयांचे बक्षीसही त्यांना रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयूरच्या धाडसाचे कौतुक करत, आपण केलेलं काम अतुलनीय असल्याचं म्हटलंय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलंय.
Mayur Shelke didn’t have a costume or cape, but he showed more courage than the bravest movie SuperHero. All of us at the Jawa family salute him. In difficult times, Mayur has shown us that we just have to look around us for everyday people who show us the way to a better world.. https://t.co/O66sPv0A3k
— anand mahindra (@anandmahindra) April 20, 2021
जावा हिरोज इनिटीएटीव्हच्या धोरणानुसार शेळके यांस नवीन जावा बाईक गिफ्ट देण्यात येईल. क्लासिक लीजेंडचे प्रमुख अनुपम थेरजा यांनी याची घोषणा केली आहे. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्र यांनीही मयूर शेळकेंच कौतुक केलंय. मयूर यांच्याजवळ खास ड्रेसकोट किंवा टोपी नाही, तरीही मयूर यांनी सुपरहिरोच्या तुलनेत अधिक धाडसी काम केलंय, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.
दरम्यान, मयूर शेळके यांच्यावर शुभेच्छांसह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. एशियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटकडूनही शेळके यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. अंध माता असलेल्या संगीत यांनी मयूर शेळकेंचे आभार व्यक्त करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.