Join us  

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, 'मदर्स डे' दिनीच अम्माला गिफ्ट केलं नवं घरं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 10:47 PM

कधी कोणाला कार भेट दिली, कधी कोणाची रिक्षा नवीन करुन दिली, नवा शोध आणि जुगाड करणाऱ्या गावखेड्यातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आनंद महिंद्र करत असतात.

मुंबई - सोशल मीडियावर सक्रीय असणारे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी जुगाडू जिप्सी बनवणाऱ्या सांगलीतील दत्तात्रय लोहार यांना जिप्सीच्या बदल्यात नवी कोरी बोलेरो कार देऊन शब्द पाळला होता. आता, आनंद महिंद्रा यांनी मदर्स डे दिवशी ईडलीवाल्या अम्माच्या घराचं स्वप्न पूर्ण करत पुन्हा एकदा वचन पूर्ण केलं आहे. आज मदर्स डेच्या निमित्ताने त्यांनी दाखवलेली माणूसकी आणि आपलेपणा सर्वांना भावला. 

कधी कोणाला कार भेट दिली, कधी कोणाची रिक्षा नवीन करुन दिली, नवा शोध आणि जुगाड करणाऱ्या गावखेड्यातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आनंद महिंद्र करत असतात. सोशल मीडियातूनच ते या लोकांशी जोडले गेले आहेत, जे लोकं सोशल मीडियावर सक्रीयही नसतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ईडलीवाली अम्मा. आनंद महिंद्रांनी ईडली अम्माला आज घर गिफ्ट दिलं. महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातील व्हिडिओत ईडली अम्मा दिसून येते. आनंद महिंद्रांनी लिहले की, आमची टीम कौतुकास पात्र आहे, कारण निश्चित केलेल्या वेळेत त्यांनी घर बांधून दिलं. त्यामुळेच, मदर्स डे दिवशी ईडली अम्माला ते घर गिफ्ट देण्यात आलं. अम्मा ह्या आईच्या गुण-पोषण काळजी घेणारी आणि निस्वार्थ भावनेचा अवतार आहे. अम्मा आणि तिच्या कामाला आधार देण्याचं सौभाग्य मिळालं. आपणा सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा... असे ट्विट आनंद महिंद्रांनी केलं आहे.  2019 मध्ये केलं होतं ट्विट

आनंद महिंद्रांनी 10 सप्टेंबर 2019 रोजी इडली अम्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी, अम्माच्या उद्योगात इन्व्हेस्ट करणे आणि तिला लाकडाच्या चुलीऐवजी गॅस स्टोव्ह देण्याचं कबुल केलं होतं. मात्र, ज्यावेळी महिंद्रा यांची टिम इडलीवाल्या अम्माला भेटायला गेली, तेव्हा अम्माने नवीन घराची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्या याच इच्छेचा सन्मान करत आनंद महिंद्र यांनी इडली अम्माला मदर्स डे निमित्त नवीन घर देऊ केलं. 

जुगाडू जिप्सीवाल्या लोहार यांना दिली होती नवी बोलेरो

मुलाने हट्ट केला म्हणून टाकावू भंगारातील वस्तू जमवून चार चाकी जीप तयार केल्याने सांगलीतील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार हे चर्चेत आले होते. तसेच त्यांनी तयार केलेली चारचाकीही चर्चेचा विषय ठरली होती. सर्वसामान्यांसह अनेक मंत्री, आमदारांनीही त्यांच्या चारचाकीचे कौतुक केले होते. या सर्वांबरोबरच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेल्या चारचाकी जीपचं कौतुक केलं होतं. तसेच या कारच्या बदल्यात त्यांना बोलेरो भेट देण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी हे वचन पाळलं असून, दत्तात्रय लोहार यांना या बोलेरोची चावी सुपुर्द केली आहे. 

टॅग्स :आनंद महिंद्रासुंदर गृहनियोजनट्विटर